(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तपासातील पारंपरिक पद्धतींना आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड देत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी विकसित केलेल्या संकल्पनेतील RAIDS ॲपने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. परभणी जिल्ह्यातील एका खून प्रकरणात कुजलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे अशक्यप्राय ठरत असताना, मृतदेहाच्या कवटीच्या रचनेवरून AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करण्यात आली. या तांत्रिक प्रक्रियेमुळे मृताची ओळख पटविण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली आणि खून प्रकरणाच्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १९०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाला आवश्यक असलेला महत्त्वाचा दुवा मिळत नसल्याने या प्रकरणात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या AI आधारित RAIDS App चा वापर करण्यात आला. मृतदेहाच्या कवटीच्या रचनेचे विश्लेषण करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संभाव्य चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित करण्यात आली. ही प्रतिमा विविध ठिकाणी प्रसारित करण्याबरोबरच परभणी पोलिसांना स्थानिक पोलीस पाटील यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रयत्नांना यश आले आणि मृतदेहाची ओळख गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) अशी निष्पन्न झाली आहे. ओळख पटविण्याच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर तपासाला पुढील दिशा मिळाली. या खून प्रकरणात मृताचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोघांना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे, तर तपासाच्या विचारपद्धतीत बदल घडविण्याचा प्रयत्न म्हणून RAIDS App कडे पाहिले जात आहे. अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यापासून ते गुन्हे तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळविण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची दिशा नितीन बगाटे यांनी रत्नागिरी पोलीस दलाला दिली आहे. परभणीतील या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेचा आंतरजिल्हा तपासात झालेला उपयोग विशेष उल्लेखनीय ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिसांची तपासकौशल्ये यांची सांगड घातल्यास गुन्हेगारी तपासाला नवी गती मिळू शकते, याचीच या कारवाईने प्रचिती दिली आहे.


