(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावसाळा अद्याप पूर्णपणे सुरूही झालेला नसताना हातखंबा परिसरातील महावितरणच्या कारभारातील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सोमवार (२२ जून) सायंकाळी सुमारे ७ वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी सकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातही रात्रीभर तब्बल दहा ते बारा वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या नियोजनशून्यतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महावितरणकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पावसाचा पहिला जोरदार मारा होण्यापूर्वीच वीजपुरवठ्याची अशी दुरवस्था झाल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. “पावसाळ्यासाठी आम्ही सज्ज आहोत” या घोषणांना हातखंबा परिसरातील परिस्थितीने अक्षरशः हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे पानवळ परिसरात पर्यायी स्रोत उपलब्ध असल्याचे सांगितले जात असतानाही दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयश आल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. येथील महावितरणच्या कारभारावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रात्रभर अंधार, उकाडा आणि वारंवार होणारे वीज खंडित होणे यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या अशा घटनांकडे केवळ तांत्रिक अडचण म्हणून पाहता येणार नाही. ही बाब संबंधित यंत्रणेच्या नियोजन आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वीजपुरवठा ही मूलभूत सेवा मानली जात असताना तिच्या व्यवस्थापनात सातत्याने हलगर्जीपणा दिसून येत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना अंधारात ठेवून केवळ आश्वासनांचे दिवे लावण्याची परंपरा कायम राहील.
हातखंबा परिसरातील नागरिकांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासह वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्याची कारणमीमांसा जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडित करून नागरिकांच्या समस्या निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने वेळेत भानावर आणावे, अन्यथा लोकक्षोभाचा सामना करण्याची वेळ महावितरणवर येऊ शकते, असा इशाराही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

