(रायगड / महाड)
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीलाही बसू लागला आहे. बुधवारी दुपारी महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस रस्ता निसरडा झाल्याने घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांची सुरक्षित सुटका
ही घटना दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने दोन्ही एसटी बस रस्त्याच्या कडेला उतरल्या आणि एका बाजूला झुकल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक आणि वाहकांनी तत्काळ दक्षता घेत आपत्कालीन दरवाजातून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर महाड-दापोली राज्य मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली. स्थानिक नागरिक, पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीही याच महाड-दापोली राज्य मार्गावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड आगाराच्या काही एसटी बस अपघातग्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिकांनी परिवहन प्रशासनाकडे पावसाळ्यात एसटी चालकांना विशेष सुरक्षित वाहनचालक प्रशिक्षण, बसच्या टायर व ब्रेकची नियमित तपासणी, धोकादायक वळणांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय आणि मुसळधार पावसात वेगावर अधिक नियंत्रण अशा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या अपघातामागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. संबंधित विभागाकडून घटनेचा तपास सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार मुसळधार पाऊस आणि निसरडा रस्ता ही दुर्घटनेची प्रमुख कारणे असू शकतात.

