(मुंबई)
मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम (TYBCom) अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका पेपरफुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत ABVP ने बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरू कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी “पेपरफुटीतील दोषींना अभय देणे बंद करा”, “CID चौकशी तात्काळ करा” आणि “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
‘राज्य सरकारची सूचना असतानाही चौकशी का नाही?’
ABVP ने आरोप केला की, राज्य सरकारने CID चौकशीबाबत स्पष्ट भूमिका घेतल्यानंतरही मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. संघटनेने प्रश्न उपस्थित केला की, पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात CID चौकशी टाळण्यामागे नेमके कोणते हितसंबंध आहेत? कोणाला संरक्षण दिले जात आहे? याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना द्यावे.
‘टीईटीप्रमाणेच कठोर कारवाई व्हावी’
ABVP ने म्हटले की, टीईटीसारख्या इतर परीक्षा गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तातडीने कठोर कारवाई केली जाते. मात्र, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुंबई विद्यापीठातील कथित TYBCom पेपरफुटी प्रकरणात प्रशासनाचे मौन आणि निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. संघटनेच्या मते, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणतीही पेपरफुटी गंभीरच असते आणि या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक आहे.
विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप
ABVP चा आरोप आहे की, राज्य सरकारच्या सूचनेनंतरही विद्यापीठ प्रशासनाने:
- CID चौकशीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
- अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
- या प्रकरणात स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला.
‘CID चौकशी करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन’
ABVP ने मागणी केली आहे की,
- TYBCom पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ CID मार्फत चौकशी करण्यात यावी.
- मुख्य सूत्रधारांसह सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
- राज्य सरकारच्या सूचनेची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने करावा.
या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

