(दापोली)
दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. सुनिल काशिराम वारीक (वय ४०, रा. सडवे, वारीकवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, टांगर येथील विश्वदीप भागराम मर्चडे यांच्या बांधकामाधीन हॉलमध्ये सुनिल वारीक हे झोपलेल्या स्थितीत आढळले. अमित चंद्रकांत काताळकर हे वारीक आणि जयंत पारकर यांना शोधण्यासाठी गेले असता त्यांना ही घटना आढळली. काताळकर यांनी वारीक यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्यांनी तात्काळ गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना घटनास्थळी बोलावले.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सरपंच व पोलीस पाटील यांनी त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, रात्री ८.२६ वाजता सुनिल वारीक यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात रात्री ८.३६ वाजता करण्यात आली असून, अमृ. क्र. ७८/२०२५, B.N.S.S. 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

