( रत्नागिरी /प्रतिनिधी )
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी तालुका शाखा दापोली ग्राम शाखा वणंद व वणंद कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद येथे रमाईची 127 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाईंचा त्याग, संयमीपणाचा आदर्श आजच्या प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आयोजित कार्यक्रमातून केले. आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी भूषविले. या कार्यक्रमाला संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ.भीमराव आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ भीमराव आंबेडकर म्हणाले की, गुजरातमधील तळाला गावात एका बौद्ध बांधवाने रमाईच्या नावाने बिल्डिंग उभारली आहे. जयपूरमध्ये साडेतीन एकरमध्ये आंबेडकर भवन आहे. त्या भवनामध्ये वातानुकूलित रमाईंच्या नावे हॉल आहे. जसजशी माता रमाईंची कीर्ती जगभरात जात आहे. बाबासाहेब घडत असताना ज्या मातेने साथ दिली त्या रमाईंचा देखील गौरव होणे गरजेचे असल्याची समज आता आलेली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना घडवण्यासाठी रमाईंचा संघर्ष महत्वाचा आहे. जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेयचे असेल तर आदी रमाई समजून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ आंबेडकर यांनी व्यक्त केले.
माता रमाई यांना वरळी येथील जागेत दफन करण्यात आले ती जागा सुरक्षित होती. त्या जागेबाबत त्यावेळच्या रिपब्लिकनच्या अनेक लीडर यांना कल्पना होती. त्यानंतर ती जागा मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशनला दाखवण्यात आली. तीन वर्ष कागदोपत्री लढा चालला आणि त्यानंतर तेथील जमीन मंजूर करून घेण्यात आली. आज वरळी येथे माता रमाई यांच्या नावाने स्मारक आहे. तिथे देखील पुतळा बसविण्यात आला आहे. त्याठिकाणी देखील हजारोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी लोक येतात. चैत्यभूमी येथे देखील एका बाजूला डॉ बाबासाहेबांचे स्मारक तर दुसऱ्या बाजूला माता रमाई यांच्या नावाने ह्युहिंग डेक महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आला आहे. समुद्रात उभारण्यात आलेला तो डेक माता रमाईंच्या नावाने करण्याचे भारतीय बौद्ध महासभेच्या आदेशाने झालेला आहे असेही डॉ भीमराव आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
![रमाईंचा आदर्श आजच्या प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे; डॉ. भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन 8 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव आंबेडकर उपस्थित त्यांना संबोधित करताना...](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250208-WA0183-300x169.jpg)
![रमाईंचा आदर्श आजच्या प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे; डॉ. भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन 8 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव आंबेडकर उपस्थित त्यांना संबोधित करताना...](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250208-WA0183-300x169.jpg)
यापुढे, रमाई ह्या दयाळू, करुणेच्या सागर होत्या. पण त्या करुणेबरोबर संयमी होत्या. प्रसंगांना तोंड देणाऱ्या होत्या. चार मुलं सोडून गेली तरीही डगमगल्या नाहीत त्या बाबासाहेबांच्या मागे उभ्या राहिल्या. जेणेकरून डॉ बाबासाहेब ध्येय-धोरणापासून विचलित होणार नाहीत हे त्यांनी पाहिले. रमाईच्या त्यागामुळे, केलेल्या सहकार्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुष झाले आणि या समाजाचा उद्धार झाला. एका बाजूला डॉ. बाबासाहेबांचा आदर्श आहे तर दुसऱ्या बाजूला महिलांसाठी रमाईंचा आदर्श आहे. त्यांचा गुण, त्याग, संयमीपणाचां आदर्श आजच्या प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे असे प्रतिपादन आंबेडकर यांनी कार्यक्रमातून केले. तसेच आज ठिकठिकाणी रमाईंचे पुतळे, स्मारक उभारली जात आहेत. मात्र त्याची सुरुवात याच वणंद येथून झाली आहे. २०१५ साली मिराताई आंबेडकरांनी मोठे परीश्रम घेऊन हे स्मारक उभारल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. देशातील एकमेव राष्ट्रीय स्मारक वणंदला आहे. त्यामुळे या सर्वाचे श्रेय मिराताई आंबेडकर यांना दिले जाते असेही डॉ आंबेडकर म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, प्रचार पर्यटन विभागाचे प्रमुख उत्तम मगरे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अनंत कासार्डेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, वणंद गावच्या पोलिस पाटील काते मॅडम, वणंद गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ चंद्रकांत जाधव, दापोली तालुका बौद्धजन पंचायत समिती चे अध्यक्ष दिलीप कासारे यांनी देखील शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माता रमाईच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय कांबळे, प्रचार पर्यटन विभागाचे सचिव रवींद्र गवई, महाराष्ट्र राज्याचे कोकण विभागीय संघटक जयवंत लवांडे, कार्यालयीन सचिव बापू निकाळजे ,वणंद गावच्या प्रथम नागरिक साधना देवघरकर, प्रतिष्ठित ग्रामस्थ चंद्रकांत जाधव, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, महाराष्ट्र राज्याचे संघटक अण्णासाहेब वाघमारे, आणि दापोली तालुका अध्यक्ष अनिल घाडगे, सरचिटणीस अशोक जाधव, रत्नागिरी तालुका अध्यक्ष विजय मोहिते , संगमेश्वर तालुका अध्यक्ष राहुल मोहिते, खेड तालुका अध्यक्ष अ के मोरे, गुहागर तालुका अध्यक्ष विद्याधर कदम, लांजा तालुका अध्यक्ष आर बी कांबळे, महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सरचिटणीस एन बी कदम यांनी केले.