(दापोली)
तालुक्यातील मांदिवली गावात प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच ग्रामस्थांचा विरोध आहे. या बाबत मागील वर्षी 18 ऑक्टोबर 2024 रोजी जनसुनावणी झाली होती. या जनसुनावणीत लोकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर या प्रकल्पाला स्थगिती आली.
मात्र, पुन्हा जनसुनावणी न होता या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावाची निसर्ग संपदा नष्ट होत असेल तर असे प्रकल्प गावात नकोत, असा ठाम विरोध येथील लोकांचा आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी येथील अनेक वृक्षांची तोड करण्यात आली. बेकायदेशीर झाडतोडीबाबत कारवाईच्या पावत्या आहेत. मात्र, तोडलेली झाडे जागेवरच नाहीत, असे म्हणणे ग्रामस्थांचे आहे.
याबाबत फक्त वरवर कारवाई करून समज दिली जात आहे. त्यामुळे या गावात या प्रकल्पाशी संबंधित लोकांची मुजोरी आणि दहशत वाढली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन करत असलेला पोकलेन जप्त करण्यात आला होता. तो 500 रुपयांच्या बॉण्डवर समज देऊन सोडण्यात आला. मात्र, आता तोच पोकलेन या उत्खनन करत आहे. या प्रास्तावित प्रकल्पापासून आमकोल गाव है तीनशे मीटर वर आहे. लोकांना पाणी पुरवठा करणारी भाराजानदी दोनशे मीटरवर आहे तर मांदिवली गाव हे 400 मीटर अंतरावर असताना शासन मात्र दखल घेत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मायनिंग दलालांची मुजोरी
या ठिकाणी सुरू असलेली मायनिंग दलालांची मुजोरी त्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे. झाडे तोडली त्यांचे व्हिडीओ करून व्हायरल केले जात आहेत. असा या गावात विध्वंस सुरू आहे. त्यामुळे शासनाने हा विनाशकारी प्रकल्प बंद करावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.