(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात चित्रपटातील थरारक प्रसंगाची आठवण करून देणारी जबरी चोरीची घटना घडली आहे. रिक्षा भाड्याने घेण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ रिक्षाचालकाला निर्जन रस्त्यावर नेले आणि चालत्या रिक्षातच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या धाडसी चोरीमुळे संगमेश्वर आणि देवरूख परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम तुकाराम शिंदे (वय ६३, रा. कोंडगाव शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) हे रिक्षाचालक असून रिक्षा व्यवसाय करतात. सोमवारी (२९ जून) संध्याकाळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून रिक्षा भाड्याने हवी असल्याचे सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी संबंधित व्यक्तीला रिक्षात बसवून प्रवास सुरू केला.
संध्याकाळी सुमारे ६.१५ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान रिक्षा मोडें खिंड ते ढवळवाडी मार्गावर आली. मोडें खिंडीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर पोहोचताच प्रवाशाने अचानक रिक्षा थांबवण्यास सांगितले. रिक्षा मंदावताच त्याने गंगाराम शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनला जोरदार हिसका मारून ती तोडली आणि क्षणार्धात रिक्षातून खाली उतरून जंगलाच्या दिशेने पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गंगाराम शिंदे यांना काही समजण्यापूर्वीच आरोपी पसार झाला. या चोरीत सुमारे ५ ग्रॅम वजनाची, साखळी डिझाइनची व बदाम आकाराचे पान असलेली सोन्याची चैन चोरट्याने लंपास केली. घटनेनंतर गंगाराम शिंदे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
आरोपीने रिक्षा बोलावण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधल्यामुळे त्याचा मोबाईल क्रमांक हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरण्याची शक्यता आहे. सायबर सेलची मदत, कॉल डिटेल्स आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवरूख पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
ज्येष्ठ रिक्षाचालकाला लक्ष्य करून भररस्त्यात अशा प्रकारे जबरी चोरी केल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

