(संगमेश्वर / एजाज पटेल)
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच संगमेश्वर एसटी स्थानकाची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. स्थानक परिसरात सर्वत्र पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना अक्षरशः चिखल तुडवत आणि वाहत्या पाण्यातून मार्ग काढत बसपर्यंत पोहोचावे लागत आहे. वारंवार तक्रारी, प्रसारमाध्यमांतील बातम्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ यानंतरही एसटी प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नियोजनाअभावी स्थानक परिसर जलमय
सोनवी पुलालगत तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याच्या कामादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारांची व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, डोंगरउतारावरून येणारे पावसाचे पाणी थेट सेवा रस्त्यावरून वाहत एसटी स्थानक परिसरात येत आहे. त्यामुळे संपूर्ण आगार परिसरात पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
स्थानकातील परिस्थितीमुळे दररोज शेकडो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि विद्यार्थी यांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत असून, घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
तक्रारी आणि बातम्यांकडेही दुर्लक्ष?
या समस्येची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या असून, प्रसारमाध्यमांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाला इशारा
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी एसटी प्रशासनाला इशारा दिला आहे. स्थानकातील चिखल आणि साचलेल्या पाण्याची समस्या तातडीने दूर न केल्यास स्थानक परिसरातच चिखलामध्ये ‘वृक्षलागवड आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“वारंवार तक्रारी, माध्यमांमधील बातम्या आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. स्थानकातील चिखलातच वृक्षलागवड करून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असेल.”
– मिथुन निकम, उपाध्यक्ष, भाजप संगमेश्वर तालुका
आता प्रशासन या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करणार की प्रवाशांना यापुढेही चिखल आणि साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागणार, याकडे संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

