(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस खाडी परिसरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीच्या पात्रात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळे कुजलेले मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मेढे तर्फे फुणगुस येथील राई-भादगाव पुलाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला, तर त्यापूर्वी डिंगणी रेती बंदर परिसरात परचुरी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला होता. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांजरे गावचे पोलीस पाटील दीपक कमलाकर सावंत यांच्याकडे मेढे तर्फे फुणगुस गावच्या अतिरिक्त पोलीस पाटीलपदाचा कार्यभार आहे. मंगळवारी (३० जून) दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राई-भादगाव पुलाखाली शास्त्री नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना पाहिला. याबाबत त्यांनी तातडीने संगमेश्वर पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो अंदाजे ३० ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मृतदेह अनेक दिवस पाण्यात असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण झाले आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे, याच फुणगुस खाडी परिसरातील डिंगणी रेती बंदरात दोन दिवसांपूर्वी परचुरी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेहही सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. संबंधित महिलेचा शोध नातेवाईक आणि पोलीस घेत असतानाच तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात शोककळा पसरली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याच नदीपात्रात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. संगमेश्वर पोलीस दोन्ही घटनांचा सखोल तपास करत असून, गेल्या काही दिवसांत परिसरातून कोणी पुरुष बेपत्ता झाला असल्यास त्याची माहिती तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

