(देवरूख)
जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना गेल्या काही वर्षांपासून मोहोर काळात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम, कीड-रोग व्यवस्थापनातील दुर्लक्ष, तसेच फवारणी वेळापत्रकाचे पालन न केल्याने मोहोर काळवंडून गळून पडतो आणि उत्पादनात लक्षणीय घट होते.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने “आंबा व काजू मोहोर संरक्षण आणि व्यवस्थापन” या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता पंचायत समिती देवरूखच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या चर्चासत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात आंबा मोहोर संरक्षण व व्यवस्थापन, तर दुपारच्या सत्रात काजू मोहोर संरक्षण व व्यवस्थापन या विषयांवर डॉ. शिंदे यांचे सविस्तर मार्गदर्शन होईल. त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र आणि शेतकऱ्यांशी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला आहे.
मागील वर्षांचे अनुभव आणि पुढील वर्षाचे नियोजन
गेल्या काही वर्षांत तुडतुड्या व डागरोगांमुळे आंबा-काजू उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर महिन्यातील मोहोर योग्य पद्धतीने संरक्षित केल्यास मार्च महिन्यातील आंबा उत्पादन अधिक दर्जेदार मिळते आणि चांगल्या दरात विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक नफा मिळतो.
काजू बाबतीत अजूनही अनेक शेतकरी फवारणी वेळापत्रकाकडे दुर्लक्ष करतात, परिणामी काजूच्या फळांवर डाग पडतात, बियांचा दर्जा घटतो आणि उत्पादन कमी होते. उदाहरणार्थ, कुडाळ तालुक्यातील शेतकरी प्रति झाड 30 ते 40 किलोपर्यंत उत्पादन घेत असताना, संगमेश्वर तालुक्यात हे प्रमाण केवळ 10 ते 20 किलो इतके आहे. ही चिंताजनक बाब बदलण्यासाठी आणि संगमेश्वर तालुक्याला कोकणातील आघाडीचा फळबाग तालुका बनवण्याचा कंपनीचा निर्धार आहे.
या उपक्रमामागचा उद्देश फक्त सल्ला देणे नसून शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन, औषध-खतांचे योग्य वेळापत्रक, तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी उपलब्ध करून देणे हा आहे. “अगर आसान होता तो हर कोई किसान होता!” या वाक्याप्रमाणेच संगमेश्वर तालुका आज प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतीकडे वाटचाल करत आहे. कंपनी या परिवर्तनाच्या प्रवासात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे.
हा उपक्रम संगमेश्वर नैसर्गिक शेती गट आणि संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. संगमेश्वर नैसर्गिक शेती गट प्रमुख हेमंत तांबे आणि कंपनीचे चेअरमन विलास शेलार यांनी सांगितले की, “हे दिवस मोहोर संरक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहेत. दुर्लक्ष करू नका, टाळू नका. तुमच्या बागेचा, तुमच्या नफ्याचा विचार करून या चर्चासत्रात सहभागी व्हा.”

