(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी गांधी जयंतीच्या औचित्याने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. महात्मा गांधींच्या वेशात एक किशोरवयीन मुलगा अचानक फलाटावर दाखल होताच प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला.
गांधीजींच्या देहबोलीचे अचूक प्रतिरुप साकारत ‘बापू’ स्थानकात येताच थेट मुंबईकडे जाणाऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत उभा राहिला. गाडी जवळ आली तेव्हा त्याने हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी थांबली नाही. यानंतर निराश बापूंनी थेट स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार वहीत नोंद केली. त्यांनी मडगाव, जामनगर, पोरबंदर एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी नोंदवत प्रवाश्यांच्या गैरसोयीवर तीव्र आक्षेप घेतला.
पत्रकारांनी विचारणा केली असता बापूंनी सांगितले की –
“गेल्या अडीच वर्षांपासून प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना यांनी वारंवार प्रस्ताव पाठवूनही या विषयावर रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसक आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.”
त्यांनी पुढे ‘आपले स्थानक स्वच्छ ठेवा’ हा संदेश देत आपला पुढील प्रवास सुरू केला.
स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही या आंदोलनाचे समर्थन करत कोकण रेल्वे प्रशासन व रेल्वे बोर्डाने सकारात्मक दृष्टीने फेरविचार करून संगमेश्वरला अतिरिक्त गाड्यांचा थांबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गांधी जयंतीच्या दिवशी चक्क गांधीजींचे प्रतिरुप स्थानकावर अवतरल्याची बातमी तालुक्यात वेगाने पसरली आणि हे अनोखे आंदोलन सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

