( मुंबई )
राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत काल 30 जून 2026 रोजी संपली आहे. त्यामुळे आज 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय HSRP प्लेट नसलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अनेक महत्त्वाच्या सेवांचाही लाभ मिळणार नाही.
आजपासून दंडात्मक कारवाई
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार कारवाई केली जाईल. ही कारवाई परिवहन विभाग आणि पोलीस संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे करू शकतात. मात्र, 30 जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला असून, त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.
RTOच्या ‘या’ सेवा मिळणार नाहीत
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना पुढील महत्त्वाच्या RTO सेवा उपलब्ध होणार नाहीत:
- वाहन हस्तांतरण (Transfer of Ownership)
- पत्ता बदल (Address Change)
- वाहनावरील कर्ज नोंदणी किंवा कर्जमुक्ती (Hypothecation)
- वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration)
- वाहनातील बदलांची नोंद (Alteration)
- परवान्याचे नूतनीकरण
मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
HSRP नंबर प्लेटचे अधिकृत दर
शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी पुढील अधिकृत शुल्क निश्चित केले आहे (GST वगळून, फिटमेंट शुल्कासह):
- दुचाकी: 450 रुपये
- तीनचाकी: 500 रुपये
- हलकी मोटार वाहने, मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने: 745 रुपये
कोणत्या कायद्यांतर्गत होणार कारवाई?
HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी हा नियम आता बंधनकारक झाला असून, दंड आणि RTO सेवांवरील निर्बंध टाळण्यासाठी वाहनांवर लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

