पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, संबंधित विंग कमांडरने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला युद्धयोजनेशी संबंधित कागदपत्रे, ड्रोनची क्षमता, लष्करी तैनातीची ठिकाणे, आघाडीवरील लढाऊ विमानांची ये-जा आणि संवेदनशील ठिकाणांचे भौगोलिक निर्देशांक (कोऑर्डिनेट्स) पुरवले होते. याशिवाय, एका गुप्त ड्रोन युनिटची रचना, त्याची बलस्थाने, कार्यान्वित क्षमता आणि युद्धाच्या परिस्थितीत करण्यात येणारी तैनाती याबाबतची माहितीही लीक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील अधिकाऱ्याला पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात त्याच्या पाकिस्तानी एजंटसोबत झालेल्या संपर्काचा आणि माहितीच्या देवाणघेवाणीचा तपशील दिला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक नग्न फोटोच्या बदल्यात युद्धयोजनेचे एक पान देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संशयित पाकिस्तानी एजंटकडून नग्न फोटो मिळाल्यानंतर अधिकाऱ्याने गोपनीय युद्धयोजनेतील एक पान अपलोड केल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या वर्षी १२ जानेवारी ते १ एप्रिल या कालावधीत संबंधित विंग कमांडर व्हॉट्सॲपवर संशयित एजंटच्या संपर्कात होता. एकदा तो आपल्या कार्यालयात स्मार्टफोन घेऊन गेला असता त्याला रोखण्यात आले आणि त्याच्या उपकरणाची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीबाबतचे तपशील समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या हेरगिरी प्रकरणात मालवेअर ॲप्लिकेशनचाही वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी एजंटने संबंधित अधिकाऱ्याला काही मालवेअर ॲप्लिकेशन्स पाठवली होती. त्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या डिव्हाइसमधील संवेदनशील माहिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणावर लक्ष ठेवणे शक्य होत असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.
याशिवाय, लेह येथे लढाऊ विमानांची करण्यात आलेली तैनाती आणि सूरतगढ येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये पार पडलेल्या लष्करी सरावाची माहितीही संबंधित अधिकाऱ्याने लीक केल्याचा आरोप आहे. लष्करी हालचाली, विमानांची वाहतूक आणि संवेदनशील ठिकाणांशी संबंधित माहिती शत्रूराष्ट्रापर्यंत पोहोचल्यास त्यातून संभाव्य ऑपरेशनल त्रुटी उघड होऊ शकतात आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले.
आरोपपत्रात संबंधित विंग कमांडर आणि संशयित पाकिस्तानी एजंट यांच्यात झालेल्या संवादाचा मोठा तपशीलही देण्यात आला आहे. व्हॉट्सॲप पीएमपी डेटाच्या विश्लेषणानुसार, दोघांमध्ये एकूण ३,००८ टेक्स्ट मेसेज, ६५ फोटो, ६५ रिअॅक्शन, ४२ व्हॉइस कॉल, ४ व्हिडिओ कॉल आणि ६ यूआरएल शेअर करण्यात आले होते. या संपर्कातून गोपनीय माहितीची देवाणघेवाण किती व्यापक स्तरावर झाली होती, याचा तपास यंत्रणा घेत आहेत.


