(नवी दिल्ली)
देशातील FASTag वाहनधारकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन वर्षात दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारीपासून नवीन FASTag घेताना आवश्यक असलेली ‘Know Your Vehicle’ म्हणजेच KYV प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो वाहनचालकांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.
नवीन FASTag घेणे होणार सोपे
आतापर्यंत कार, जीप आणि व्हॅनसारख्या चारचाकी वाहनांसाठी FASTag घेताना KYV प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. अनेकदा सर्व कागदपत्रे असूनही FASTag अॅक्टिव्ह होण्यात अडचणी येत होत्या. आता ही प्रक्रिया रद्द केल्याने नवीन FASTag घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.
बँकांसाठी नियम अधिक कडक
KYV प्रक्रिया रद्द करण्यात आली असली तरी NHAI ने बँकांसाठी नियम कठोर केले आहेत. FASTag अॅक्टिव्ह करण्यापूर्वी संबंधित बँकांना ‘वाहन’ डेटाबेसमधून वाहनाची माहिती तपासावी लागणार आहे. जर ही माहिती डेटाबेसमध्ये उपलब्ध नसेल तर आरसी बुकच्या आधारे तपासणी केली जाईल.
जुन्या FASTag धारकांना दिलासा
ज्यांच्याकडे आधीपासून FASTag आहे, अशा वाहनधारकांना आता नियमितपणे KYV करण्याची गरज भासणार नाही. केवळ काही विशिष्ट परिस्थितीतच ही प्रक्रिया आवश्यक असेल, असे NHAI ने स्पष्ट केले आहे.
KYV केव्हा करावी लागेल?
खालील परिस्थितीत KYV प्रक्रिया आवश्यक ठरू शकते:
- FASTag चा चुकीचा वापर होत असल्याची तक्रार आल्यास
- टॅग वाहनावर चिकटवलेला नसल्यास किंवा तांत्रिक बिघाड असल्यास
- चुकीच्या पद्धतीने FASTag जारी झाल्याचे आढळल्यास
NHAI च्या या निर्णयामुळे FASTag वापर अधिक सुलभ होणार असून वाहनचालकांचा अनावश्यक मनस्ताप कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

