( शिर्डी )
देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या अढळ श्रद्धेमुळे शिर्डी साईबाबा संस्थानची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानला रोख, डिजिटल आणि वस्तूरूप देणग्यांसह सुमारे 660 कोटी रुपयांचे योगदान प्राप्त झाले आहे. याच कालावधीत संस्थानच्या मुदत ठेवी 3,618.56 कोटी रुपयांवर पोहोचल्या असून केवळ व्याजातूनच 256.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या वर्षभरात तब्बल 3 कोटींहून अधिक भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्या, डिजिटल माध्यमातून वाढणारे दान आणि प्रभावी आर्थिक व्यवस्थापनामुळे संस्थानचा आर्थिक पाया अधिक भक्कम होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानला 638 कोटी रुपयांची आर्थिक देणगी मिळाली. याशिवाय सुमारे 28 कोटी रुपयांच्या वस्तूरूप देणग्या प्राप्त झाल्या. साई संस्थानच्या रुग्णालयांसाठी भाविकांनी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणेही दान केली असून त्यांची किंमत अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
डिजिटल देणग्यांमध्ये वाढ
देणग्यांच्या स्वरूपाचा विचार करता, दक्षिणा पेटी आणि देणगी काउंटरमधून 195.24 कोटी रुपये जमा झाले. तर ऑनलाइन, यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, धनादेश आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून 122.38 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली. परदेशातील साईभक्तांनी 4.89 कोटी रुपयांचे परकीय चलन अर्पण केले. दर्शन आणि आरती प्रवेशिका शुल्कातून 39.55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे डिजिटल व्यवहारांद्वारे देणगी देण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
3,618 कोटींच्या ठेवींवरून 256 कोटींचे व्याज
साई संस्थानच्या आर्थिक बळकटीत मुदत ठेवींवरील व्याजाचा मोठा वाटा आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत केवळ मुदत ठेवींवरील व्याजातून 256.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानच्या 3,618.56 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी असून खर्चानंतरची शिल्लक रक्कम पुन्हा गुंतवली जात असल्याने हा निधी सातत्याने वाढत आहे. 15 जून 2026 अखेर संस्थानकडे 549.44 किलो सोने असून त्याचे मूल्य सुमारे 151.87 कोटी रुपये आहे. तसेच 7,030.47 किलो चांदीचा साठा असून त्याची किंमत सुमारे 25.33 कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षातच भाविकांनी 16 किलो सोने आणि 197 किलो चांदी साई चरणी अर्पण केली आहे.
552 कोटी रुपये जनकल्याणासाठी खर्च
साईभक्तांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर विविध समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रमांसाठी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थानने पायाभूत सुविधा, रुग्णालये, आरोग्य सेवा, आशियातील सर्वात मोठ्या मोफत प्रसादालयाचे संचालन, वीज खर्च, कर्मचारी वेतन, भक्तनिवासे, शैक्षणिक संकुले आणि इतर योजनांवर 552.33 कोटी रुपये खर्च केले.
वार्षिक आर्थिक व्यवहार 850 कोटींच्या पुढे
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईबाबांचा अन्नदान, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश संस्थान प्रभावीपणे जपत आहे. भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांचा उपयोग रुग्णसेवा, शिक्षण, भक्तनिवासे आणि विविध विकासकामांसाठी केला जात आहे. वाढत्या देणग्या, मजबूत गुंतवणूक आणि व्यापक सामाजिक कार्यामुळे शिर्डी साईबाबा संस्थानचा वार्षिक आर्थिक व्यवहार 850 कोटी रुपयांहून अधिक झाला असून देशातील सर्वाधिक सक्षम धार्मिक संस्थांमध्ये त्याची गणना होत आहे.

