(मुंबई / वृत्तसंस्था)
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवन प्रमाणपत्राचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ७१ वर्षीय निवृत्त महिला रेल्वे कर्मचाऱ्याला ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. जीवन प्रमाणपत्र अपडेट करून देण्याच्या बहाण्याने बँक अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यात प्रवेश मिळवला. त्यानंतर तिच्या सुमारे ४३ लाख रुपयांच्या मुदत ठेवींशी छेडछाड करून त्यावर कर्ज घेतले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वळवले. या संपूर्ण प्रकारात महिलेचे १७ लाख २४ हजार रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय उपचारांसाठी हाजी अली परिसरात नातेवाईकांसोबत वास्तव्यास आहे. तिचे मुख्य बँक खाते उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील बँकेत आहे. निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. याच प्रक्रियेची माहिती असल्याने सायबर गुन्हेगारांनी तिला लक्ष्य केले.
महिलेने फेसबुकवर इंडियन बँकेच्या माध्यमातून ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्यासंदर्भातील जाहिरात पाहिली होती. प्रमाणपत्र अद्ययावत करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी तिने जाहिरातीवर क्लिक केले. त्यानंतर बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत काही व्यक्तींनी तिच्याशी संपर्क साधला. पेन्शनसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी महिलेच्या मनात निर्माण केला.
६ नोव्हेंबर रोजी या भामट्यांनी पुन्हा महिलेशी संपर्क साधला. बँकेच्या मोबाईल ॲपमधील सुरक्षा प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि एम-पिन (M-PIN) बदलण्यास तिला सांगण्यात आले. त्यानंतर मोबाईलवर येणारे ओटीपी आणि इतर संदेश व्हॉट्सॲपवर पाठवण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे महिलेने माहिती शेअर केली. याच माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांनी तिच्या मोबाईल बँकिंग खात्याचा ताबा मिळवला आणि आवश्यक व्यवहार पूर्ण केले.
प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतर भामट्यांनी महिलेला मोबाईल बँकिंग ॲप तसेच आलेले संदेश डिलीट करण्यास सांगितले. पेन्शनचे जीवन प्रमाणपत्र अपडेट होत असल्याच्या समजुतीत असलेल्या महिलेला आपली आर्थिक फसवणूक झाल्याची कोणतीही कल्पना आली नाही.
मात्र, ९ नोव्हेंबर रोजी तिने पुन्हा मोबाईल बँकिंग ॲप सुरू करून खात्यातील शिल्लक तपासली असता धक्कादायक प्रकार उघड झाला. तिच्या अनेक मुदत ठेवी गोठवण्यात आल्याचे दिसून आले. बँकेशी संपर्क साधून व्यवहारांची माहिती घेतल्यानंतर तिच्या नावावर दोन नवीन बचत खाती उघडण्यात आल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर तिच्या मुदत ठेवींवरही कर्ज घेण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या एकूण १३ मुदत ठेवींपैकी तीन ते चार ठेवी मुदतपूर्व मोडण्यात आल्या. या व्यवहारांतून तिच्या मुख्य बँक खात्यातील ९ लाख १० हजार रुपये अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. याशिवाय, महिलेच्या परवानगीशिवाय मुदत ठेवींवर कर्ज मिळवण्यासाठी दोन ओव्हरड्राफ्ट खाती उघडण्यात आली. या खात्यांच्या माध्यमातूनही रक्कम काढून विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. अशा प्रकारे महिलेच्या खात्यातून एकूण १७ लाख २४ हजार रुपये काढण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या कारवायांमुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


