(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील ‘ग्लोबल आयटी सेंटर’मधील मुख्य सर्व्हरवर सायबर गुन्हेगारांनी घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात गोपनीय माहिती चोरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात सुमारे ३.७५ लाख बँक नोंदी, विविध ॲप्लिकेशन्सशी संबंधित डेटा आणि ४,२८० ग्राहकांची संवेदनशील माहिती चोरीला गेली आहे. चोरी केलेल्या डेटापैकी काही माहिती हॅकर्सनी डार्क वेबवरही प्रसिद्ध केली. या घटनेच्या सुमारे महिनाभरानंतर १२ नोव्हेंबर रोजी सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत एसबीआयच्या सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाला. बँकेची गोपनीय माहिती डार्क वेबवर उपलब्ध झाल्यानंतर डेटा चोरीचा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर बँकेचे अधिकारी भावेश निकम (३८) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीत ‘सिरियसिम’ (Siriusim) नावाच्या हॅकर गटाचा उल्लेख करण्यात आला आहे. या गटाच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला आणि संगणक प्रणालीतील महत्त्वाचा डेटा हस्तगत केला, असा आरोप आहे. या कारवाईत सुमारे ३२ सीएसव्ही (CSV) फाइल्स चोरीला गेल्या. त्यामध्ये एसबीआयच्या विविध ॲप्लिकेशन्सशी संबंधित सुमारे ३.७५ लाख नोंदी होत्या. याशिवाय, डेटा साठवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेएसओएन (JSON) फॉरमॅटमधील फाइल्सही चोरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या सायबर हल्ल्यात २,७२१ पीडीएफ (PDF) दस्तऐवजही हॅकर्सच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांमध्ये ४,२८० ग्राहकांची माहिती असल्याचे समोर आले आहे. त्यात ग्राहकांचे वैयक्तिक तपशील, कर्जासाठी केलेले अर्ज, नवीन बँक खाते उघडण्यासाठी भरलेले फॉर्म, संपर्क क्रमांक आणि पत्ते यांचा समावेश आहे. त्यामुळे केवळ बँकेच्या अंतर्गत नोंदीच नव्हे, तर ग्राहकांच्या ओळखीसंबंधी आणि आर्थिक व्यवहारांशी निगडित संवेदनशील माहितीही चोरीला गेली आहे.
चोरी झालेल्या डेटापैकी काही भाग डार्क वेबवर प्रसिद्ध करण्यात आल्याने ग्राहकांच्या गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डार्क वेबवरून चोरीला गेलेला डेटा हटवण्यात आला आहे. तसेच, चोरी झालेल्या माहितीचा कोणताही गैरवापर झालेला नसल्याची खात्री केल्याचा दावा बँकेने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल एफआयआरमध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही. त्याऐवजी ‘सिरियसिम’ या हॅकर गटासह एका विशिष्ट इंटरनेट प्रोटोकॉल (IP) पत्त्याशी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या बँकिंग यंत्रणेच्या सर्व्हरमध्ये झालेल्या या घुसखोरीचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.


