(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी हॉटेल संगम रेसिडेन्सी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. संदीप सखाराम करे यांनी रोटरी वर्ष २०२६-२७ साठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
गेली २१ वर्षे विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या क्लबच्या या सोहळ्यास इंस्टॉलेशन ऑफिसर तथा प्रमुख पाहुणे रोटेरियन सुहास जोशी (DGND 3172), रोटेरियन अशोक नाईक (DGND 3171), असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन श्रीकांत भुरके (२०२५-२६) आणि असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अविनाश पालशेतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मावळत्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेत सहकारी, सदस्य आणि कुटुंबीयांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रोटेरियन राजेंद्र कदम, वामन सावंत आणि सीताराम सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
क्लबचे सेक्रेटरी रोटेरियन राजेंद्र कदम यांनी वार्षिक अहवाल सादर करताना ग्रामीण भागातील वैद्यकीय शिबिरे, शाळकरी मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा, हिरकणी कक्षांसाठी खुर्च्यांचे वाटप, गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीन पावडरचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच महिला बचत गटांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला.
यानंतर रोटेरियन सुहास जोशी यांच्या हस्ते डॉ. संदीप करे यांना अध्यक्षपदाची पिन व कॉलर प्रदान करून अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. तसेच रोटेरियन सीताराम सावंत यांनी सेक्रेटरी, तर रोटेरियन विनायक निकम यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला.
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी आगामी वर्षात अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. परस्पर विश्वास, मैत्री, सहकार्य आणि समर्पणाच्या भावनेतून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात डॉ. संघमित्रा फुले, डॉ. स्नेहल अंधारे, डॉ. अमिता हिप्पळगावकर आणि प्रदीप साळुंखे यांचा नवीन सदस्य म्हणून रोटरी परिवारात समावेश करण्यात आला.
प्रमुख पाहुणे रोटेरियन डॉ. सुहास जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मावळत्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. संदीप करे यांना नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सेवाभावी कार्याचा अधिक विस्तार करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटेरियन्स, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सावंत आणि रोटेरियन आकांक्षा हिराकांत साळवी यांनी केले, तर सेक्रेटरी रोटेरियन सीताराम सावंत यांनी उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे आभार मानले.

