(नाशिक / वृत्तसंस्था)
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क असतानाच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या संदीप बाळासाहेब भामरे या तरुणाकडून १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रोकडीच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती आणि वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने आरपीएफने त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान गुरुवारी नाशिक रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक २२११२ अमृत भारत एक्स्प्रेसमधून एक तरुण उतरला. त्याच्या संशयास्पद हालचाली आरपीएफ जवानांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. यावेळी बॅगेत ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. मोजणीअंती ही रक्कम १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीदरम्यान संबंधित तरुणाची ओळख संदीप बाळासाहेब भामरे अशी पटली. तो मूळचा आटपाडी, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून सध्या जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. एवढी मोठी रक्कम जवळ बाळगण्याचे कारण काय, ती कुठून आणली आणि कोणाकडे नेली जात होती, याबाबत आरपीएफ जवानांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र, रोकडीच्या स्रोतासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण देण्यास तसेच वैध कागदपत्रे सादर करण्यास तो अपयशी ठरला.
त्यानंतर आरपीएफने संदीप भामरे याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडीचा नेमका स्रोत काय आहे, ती कोणाची आहे आणि कुठे नेली जात होती, याचा तपास सुरू आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा विशेष दक्षता घेत असताना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर झालेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


