(रत्नागिरी / वैभव पवार)
भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची जाणीव नव्या पिढीमध्ये रुजविण्यासह युवकांमध्ये संविधानाचा अभ्यास, वैचारिक चिंतन आणि लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) युवाशक्ती, दक्षिण कोकण विभागाने पुढाकार घेतला आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान हा केवळ देशाच्या राज्यकारभाराचा दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा विचारमंत्र आहे. संविधानातील मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, नव्या पिढीने संविधानाचा चिकित्सक अभ्यास करावा आणि लेखनाच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीची भावना विकसित व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशी माहिती कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभागप्रमुख तथा युवा साहित्यिक अरुण मोर्ये यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. मालगुंड शाखा युवाशक्तीप्रमुख अमेय धोपटकर हे या स्पर्धेचे संपर्कप्रमुख असतील. ‘भारताचे अखंडत्व राखणारे संविधान’ आणि ‘अखंड भारताची आत्मशक्ती – संविधान’ असे दोन विषय स्पर्धेसाठी देण्यात आले असून निबंधाची शब्दमर्यादा १००० शब्द आहे.
चिपळूण तालुक्यातील स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. चिपळूण शाखा युवाशक्तीप्रमुख समरिन कुनके या स्पर्धेच्या संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ‘भारतीय संविधान – लोकशाहीचा भक्कम आधार’ आणि ‘भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी’ हे दोन विषय असून निबंधाची शब्दमर्यादा १२०० ते १५०० शब्द अशी निश्चित करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यात खुला, महाविद्यालयीन आणि शालेय अशा तीन गटांत स्पर्धा होणार आहे. राजापूर शाखा युवाशक्तीप्रमुख नितिश खानविलकर हे स्पर्धेचे संपर्कप्रमुख आहेत. खुल्या गटासाठी १२०० शब्दांची मर्यादा असून ‘संविधानिक मूल्ये आणि वर्तमान सामाजिक वास्तव’, ‘समताधिष्ठित समाजनिर्मितीमध्ये संविधानाची भूमिका’ आणि ‘संविधानिक अधिकार आणि नागरिकांची कर्तव्ये’ हे विषय देण्यात आले आहेत.
महाविद्यालयीन गटासाठी निबंधाची शब्दमर्यादा १००० शब्द असून ‘युवकांची संविधानाप्रती जबाबदारी’, ‘संविधान आणि सामाजिक न्यायाची संकल्पना’ आणि ‘भारतीय संविधान – लोकशाहीचा आत्मा’ या विषयांवर निबंध सादर करता येतील. शालेय गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून त्यांच्यासाठी ७०० शब्दांची मर्यादा आहे. ‘लोकशाहीचा उत्सव – संविधान दिन’ आणि ‘माझे संविधान, माझा अभिमान’ हे दोन विषय या गटासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
सर्व स्पर्धकांनी आपले निबंध २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित संपर्कप्रमुखांकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. निबंध लेखनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करण्यास मनाई आहे. निबंध टंकलिखित किंवा सुवाच्य हस्ताक्षरात असणे आवश्यक आहे. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत निबंधांचे परीक्षण केले जाणार असून संविधान दिनी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती आणि सहभागासाठी रत्नागिरी तालुक्यातील स्पर्धकांनी अमेय धोपटकर (८८८८० ३३६२१), राजापूर तालुक्यातील स्पर्धकांनी नितिश खानविलकर (८२३७३८११३८) आणि चिपळूण तालुक्यातील स्पर्धकांनी समरिन कुनके (९०२१९ १६१६८) यांच्याशी संपर्क साधावा.
संविधान हा केवळ वाचनाचा विषय नसून तो आचरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे. हाच विचार साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, महाविद्यालयीन तरुणाई, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभागप्रमुख अरुण मोर्ये यांनी केले आहे.


