(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध मतदारसंघांचा दौरा केला होता. मात्र, त्यांचा दौरा संपताच शिंदे गटाने सचिन अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी देत मोठी राजकीय खेळी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा “ऑपरेशन टायगर 3.0″ची चर्चा रंगू लागली आहे.
सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
सचिन अहिर हे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील महत्त्वाचे नेते मानले जात होते. विशेषतः वरळी परिसरात त्यांचा प्रभाव असल्याने त्यांच्या या निर्णयाचे मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी सचिन अहिर यांचे शिंदे गटात स्वागत करत, “आगे आगे देखो होता है क्या…” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात आणखी काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाकडून या घडामोडीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयावर टीका करत, “याला बंडखोरी म्हणायची की विकाऊ आमदार?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, “काही माणसे कशी गद्दार निघतात, हे आता दिसत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात शिवसेनेतील आणखी काही घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

