(मुंबई)
राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वाहनाला अद्याप हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली नसेल, तर आजच ती बसवून घेणे आवश्यक आहे. HSRP बसवण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपत असून १ जुलैपासून राज्य परिवहन विभागाकडून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, मुदत संपल्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांकडून १,००० रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल.
राज्यात HSRP बसविण्यास पात्र असलेल्या सुमारे २.१० कोटी वाहनांपैकी आतापर्यंत केवळ ५१ टक्के वाहनांवरच ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. उर्वरित वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
‘या’ RTO सेवांवरही होणार परिणाम
HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना केवळ दंडच भरावा लागणार नाही, तर RTOच्या अनेक महत्त्वाच्या सेवांचाही लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण, पत्त्यात बदल, वाहनाचे पुनर्नोंदणी (Re-registration), वाहनातील बदलांची नोंद तसेच ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (Renewal) यांसारख्या सेवांचा समावेश आहे. मात्र, फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणासाठी HSRPची अट लागू करण्यात आलेली नाही, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
अपॉइंटमेंट बुक केली असल्यास दिलासा
ज्या वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी अधिकृत पोर्टलवर HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे अशा वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने HSRP बसविण्याची जबाबदारी रोझमर्टा टेक्नॉलॉजीज, रिअल इंडस्ट्रीज आणि एफटीए HSRP सोल्युशन्स या तीन अधिकृत कंपन्यांकडे सोपवली आहे.
HSRP नंबर प्लेटचे अधिकृत दर
- दुचाकी: ₹४५० + जीएसटी
- तीनचाकी: ₹५०० + जीएसटी
- चारचाकी व इतर वाहने: ₹७४५ + जीएसटी
मुदतवाढ नाही; नियमांचे काटेकोर पालन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, HSRP बसविण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
१ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

