(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आज (सोमवारी) सकाळी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुवातीला आग किरकोळ स्वरूपाची असली तरी काही वेळातच तिने उग्र रूप धारण केले. आगीमुळे डायलिसिस विभागात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या अनेक वृद्ध रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि विभागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढून अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला.
आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

