(गुहागर)
गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटपन्हाळे येथील १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच “मधुबन” येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ४२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.
या स्नेहमेळाव्यास त्या काळातील शिक्षकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. अनेक वर्षांनंतर झालेल्या गुरु-शिष्यांच्या पुनर्भेटीने वातावरण भावूक झाले.
यावेळी सौ. पोंक्षे मॅडम यांनी आपल्या मनोगतात “इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला. “तुम्ही प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी शाळेचे, गुरुजनांचे आणि समाजाचे ऋण विसरू नका. त्या मूल्यांचे जतन करत जीवन जगावे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
यावेळी श्री. पोंक्षे सर, बुरुंगळे सर आणि परचुरे सर यांनीही विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक दशकांनंतर मित्रांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.
साठी ओलांडलेले माजी विद्यार्थी आणि सत्तरीतील शिक्षक यांच्या उपस्थितीत झालेला हा स्नेहमेळावा स्नेहभोजनाने अधिक संस्मरणीय ठरला. भविष्यातही अशाच पद्धतीने नियमितपणे एकत्र येत मैत्री आणि गुरु-शिष्यांचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

