(गुहागर)
तालुक्यातील मढाळ गावची अस्मी संतोष जाधव (वय १५) हिच्या आजारपणामुळे तिच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली होती. यासाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु अस्मीचे वडील संतोष जाधव यांचे पाच महिन्यांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाल्याने घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण झाली होती. कुटुंबातील एकमेव उत्पन्नाचे साधन हरपल्यामुळे अस्मीच्या आई सनीशा जाधव यांना मुलीच्या उपचारांसाठी पैशांची मोठी चिंता होती.
प्रयत्न करूनही आवश्यक निधी उभा राहू शकला नाही. शेवटी अस्मीच्या आईने मदतीसाठी मढाळ गावच्या सरपंच सौ. अंकिता अजय चव्हाण यांची भेट घेतली आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली.
सरपंच अंकिता चव्हाण यांनी तत्काळ पुढाकार घेत गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांची भेट घेतली. अस्मीच्या परिस्थितीची सविस्तर माहिती देत त्यांनी आर्थिक मदतीची विनंती केली. आमदार जाधव यांनी तत्परतेने शासकीय योजनेतून मदत मिळवून दिली, तसेच स्वतःकडूनही आर्थिक सहाय्य केले.
तरीदेखील सुमारे २५ हजार रुपयांची रक्कम अपुरी राहिली. त्यानंतर सरपंच अंकिता चव्हाण यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की “आपल्या गावच्या लेकरासाठी यथाशक्ती मदतीचा हात द्या.” या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि उर्वरित रक्कम अल्पावधीत जमा करण्यात यश मिळवले. या सामूहिक प्रयत्नांमुळे अस्मीवर दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आणि तिचे प्राण वाचले.
मानवतेचा आदर्श ठरलेल्या या घटनेने मढाळ गावासह संपूर्ण पंचक्रोशीत सरपंच सौ. अंकिता चव्हाण यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांनीही वेळेवर पुढाकार घेतल्याबद्दल सरपंच चव्हाण यांचे अभिनंदन केले.
सरपंच सौ. अंकिता चव्हाण या केवळ अस्मीच नव्हे, तर इतर अनेक गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून मदत मिळवून देतात. माणुसकी आणि सेवाभाव यांचे उत्तम उदाहरण म्हणजे सरपंच सौ. अंकिता चव्हाण यांचे हे कार्य आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

