(चिपळूण)
रत्नागिरी पोलीस दलाच्या पुढाकाराने आणि अनारी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अनारी प्राथमिक शाळेत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा हृद्य सोहळा उत्साहात पार पडला. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे भारावून गेलेल्या ज्येष्ठांनी, “म्हातारपणातही आमची दखल घेतली जाते, हा सन्मान आमच्यासाठी आयुष्यभराची अमूल्य आठवण आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
रत्नागिरी पोलीस दलातर्फे जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सन्मान उपक्रमांतर्गत नुकताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे ग्रामस्थांनीही मनापासून स्वागत केले.
यावेळी सरपंच सदानंद पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “गावातील ज्येष्ठ नागरिक हेच आमच्या गावाचे खरे वैभव आहेत. त्यांच्या त्याग, परिश्रम, अनुभव आणि मार्गदर्शनामुळेच गावाच्या विकासाचा पाया मजबूत झाला आहे. त्यांचे मार्गदर्शन पुढील पिढीलाही लाभत राहावे, हीच अपेक्षा आहे.” माजी सरपंच शांताराम लाड यांनीही ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस पाटील विजय जाधव आणि महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सरपंच सदानंद पवार, माजी सरपंच शांताराम लाड, पोलीस पाटील विजय जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण पवार, माजी अध्यक्ष सुधाकर पवार, मुख्याध्यापक किशोर मोहिते, अंगणवाडी सेविका वनिता पवार, शिक्षक गणेश वीर, माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय कदम यांनी केले.
छायाचित्र : अनारी प्राथमिक शाळेत रत्नागिरी पोलीस दलाच्या पुढाकाराने आयोजित ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यात उपस्थित मान्यवर आणि सन्मानित ज्येष्ठ नागरिक.

