(गुहागर)
गुहागर महावितरण उपविभाच्या जनमित्रांनी फॉल्टी वीजवाहिनीची मध्यरात्रीच्या सुमारास जंगलमय भागातून पेट्रोलिंग करत तब्बल २५ वीज खांबांवर प्रत्यक्षात चढून तपासणी करत दुरुस्ती केली.
३३ के.व्ही. लोटे क्र. ०८ वी वीजवाहिनी दि. २७जून रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास फॉल्टी झाल्याचे गुहागर तालुका महावितरणच्या जनमित्रांना समजले. या जनमित्रांनी तत्काळ ३ विभागांचे कर्मचारी बोलवून पेट्रोलिंग सुरू करण्यात आली.
सुरुवातीला पारेषणच्या उपकेंद्राकडून थ्री फेज ओव्हर करंट फॉल्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संपूर्ण घनदाट जंगल भागातून साधारण ६० वीजखांबांचे पेट्रोलिंग करण्यात आले. अर्थात ३ फेजवरती फॉल्ट नसल्याने कुठेच काही दिसून आले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ट्राइल घेतली असता लाईन ट्रिप झाल्याचे समजले. त्या ठिकाणी सर्व कर्मचारी जमा झाले. यावेळी पिन फॉल्ट म्हणजे अर्थ फॉल्टच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करायचे ठरविण्यात आले. अर्थात रात्रीची वेळ असूनसुध्दा प्रत्येक वीज खांबावर चढून फॉल्ट काढण्याशिवाय पर्याय नव्हता.
या मोहिमेनुसार, घनदाट जंगल भागातील तब्बल २५ वीजखांबांवर चढून पिन चेक करण्यात आल्या व सर्व शंका असलेल्या पिन रिप्लेस करून रात्री २ च्या सुमारास ट्राइल घेऊन लाईन सुरू करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसात सुमारे ६ तास घनदाट जंगलात सर्व जनमित्रांनी ही मोहिम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
अवघड कामांमध्येही तत्पर
गुहागर तालुक्यात वीजेबाबत कोणतीही समस्या निर्माण झाल्यास हे महावितरणचे जनमित्र २४ तास तत्पर असतात. प्रत्यक्षात जागेवर जाऊन तेथील तपासणी करुन वीजपुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच सर्वात उंचावरुन जाणाऱ्या वीजवाहिन्यांना स्पर्श होणारी झाडांची फांदी मारणे, झाडी तोडणे अशी अवघड कामे करतात. त्यामुळे या जनमित्रांचे कौतुक होत आहे.

