(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल ग्राहकांसाठी आणि डाक प्रशासनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर पोस्टाचा स्वतंत्र ‘चिपळूण विभाग’ १ जुलै २०२६ पासून कार्यरत होणार आहे. नव्या विभागाचा शुभारंभ बुधवारी (१ जुलै) सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.
नव्या चिपळूण विभागात उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील पोस्टल सेवा आणि प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
सध्याचा रत्नागिरी डाक विभाग राजापूरपासून वेशवीपर्यंतच्या विस्तीर्ण आणि दुर्गम भागात कार्यरत असल्याने प्रशासकीय कामांवर मोठा ताण येत होता. तसेच विभागीय स्तरावरील विविध कामांसाठी नागरिकांना रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात जावे लागत होते.
आता स्वतंत्र चिपळूण विभाग सुरू झाल्यामुळे उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांतील नागरिकांची विभागीय कामे स्थानिक पातळीवरच होणार असून, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे. या निर्णयामुळे पोस्टल सेवा अधिक जलद, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

