(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (सीजीपीए) आयोजित ‘आषाढरंग २०२६’ हा सांस्कृतिक आणि स्नेहमेळावा हॉटेल अभिरुची येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कॅरोके सिंगिंग, गप्पा, हास्यविनोद आणि स्नेहपूर्ण वातावरणामुळे रंगलेली ही संध्याकाळ सीजीपीए परिवारासाठी अविस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सीजीपीएचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षभर संघटनेच्या विविध उपक्रमांना सदस्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच वर्षभर राबविण्यात आलेल्या सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा आढावा पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे उपस्थितांसमोर मांडला.
डॉ. विशाल पेटकर यांच्या उत्साही सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगतदार सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या कॅरोके सिंगिंगमध्ये सीजीपीएच्या डॉक्टर सदस्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. अनेक डॉक्टरांनी अल्पावधीत सराव करून उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. डॉक्टरांच्या गायनातील उत्साह आणि कलागुणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
डॉ. मंगेश वाजे आणि डॉ. रणजीत पाटील यांनी खुमासदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. अतीन औताडे यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन अधिक सुरेखपणे पार पडले.
‘आषाढरंग २०२६’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता सीजीपीए परिवारातील स्नेह, एकजूट, कलागुण आणि परस्परांतील जिव्हाळ्याचा सुंदर उत्सव ठरला. सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या स्नेहमेळाव्याचे रूपांतर छोटेखानी ‘मिनी गॅदरिंग’मध्ये झाले.
यावेळी डॉ. औताडे, डॉ. विखारे, डॉ. संतोष दाभोळकर, डॉ. सुभाष उतेकर, डॉ. राकेश चाळके, डॉ. नितीन शिंदे, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. चैतन्य खोत, डॉ. चेतन पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रसाद खातू, डॉ. दळी, डॉ. निरंजन तांबे, डॉ. संदीप दाभोळकर, डॉ. ऋषिकेश चितळे, डॉ. समिध चिकटे, डॉ. दंडगे, डॉ. मन्सूर परकार, डॉ. खांबे यांच्यासह चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य डॉक्टर व महिला डॉक्टर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे तसेच उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या संपूर्ण सीजीपीए परिवाराचे सेक्रेटरी डॉ. ओंकार बेल्लारीकर, डॉ. अभिजीत दुधाळ आणि डॉ. स्नेहल जोशी यांनी असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.

