(राजापूर / वार्ताहर)
आंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने तसेच यामुळे रस्ता खचण्याची भीती असल्याने कोकण आणि कोल्हापूरदरम्यानची एसटी आणि अवजड वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे ओणी–रायपाटण–पाचल–अणुस्कुरा मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली असून, खड्डेमय आणि अरुंद रस्त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून ओणी ते अणुस्कुरा मार्गाची दुरवस्था झाली आहे. ओणी–दैतवाडी, सौंदळ घाटी, सौंदळ बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण आणि रायपाटण परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आंबा घाटात यापूर्वी मार्ग खचल्याने अवजड वाहतूक अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी पुन्हा रस्ता धोकादायक बनल्याने घाटातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूकही अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आली आहे.
या मार्गावर लाकूड वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नियमित वर्दळ असते. याशिवाय सिलिंडर, पेट्रोल-डिझेल आणि अन्य मालवाहतूक करणारी वाहनेही मोठ्या संख्येने धावतात. वाढलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावरील खड्डे अधिक रुंद आणि धोकादायक होत असल्याचे चित्र आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने अडथळा
खड्ड्यांसोबतच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी झाली आहे. समोरासमोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच अवजड वाहने आणि एसटी बसची वाढलेली वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
४० लाख रुपये खर्चूनही खड्ड्यांचा पुन्हा ‘पुनर्जन्म’
ओणी–अणुस्कुरा मार्ग गेल्या दोन-तीन वर्षांपासून खड्ड्यांच्या समस्येने त्रस्त आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात या मार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, काम झाल्यानंतर काही दिवसांतच खड्ड्यांनी पुन्हा तोंड उघडले आहे. अनेक ठिकाणी रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने मागील कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करा
गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणात चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्यामुळे अणुस्कुरा मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, दुतर्फा वाढलेली झाडी हटवावी आणि मार्ग वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आंबा घाटाला पर्यायी महत्त्वाचा मार्ग म्हणून अणुस्कुरा घाटाचा वापर वाढत असताना प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष न दिल्यास वाहतूक कोंडीसोबतच अपघाताचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ओणी–रायपाटण–पाचल–अणुस्कुरा मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

