(रत्नागिरी / वार्ताहर)
सौभाग्य, श्रद्धा आणि अखंड वैवाहिक नात्याचे प्रतीक मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण रत्नागिरीत पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. भर पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि सात जन्मी हाच पती मिळावा, अशी मनोभावे प्रार्थना केली.
भारतीय संस्कृतीत वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध मंदिर परिसरातील वटवृक्षांजवळ सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे अर्पण करून तसेच वाण देत सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा केली.
पूजेनंतर महिलांनी वटवृक्षाला पवित्र दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या आणि आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसेच अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली. धार्मिक वातावरण, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिभावाने परिसर भारावून गेला होता. हिंदू धर्मातील महत्त्वाचा मानला जाणारा हा सण रत्नागिरीत सर्वत्र श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
फोटो : वटपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीतील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर परिसरातील वटवृक्षाचे पूजन करून सात प्रदक्षिणा घालत अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सुवासिनी.
(छायाचित्र : दिनेश पेटकर)

