(रत्नागिरी)
एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे आणि सांगलीचा आदित्य चव्हाण यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत एकूण चार पैकी चार गुण मिळवून आघाडी मिळवली असून चौथ्या फेरीत अग्रमानांकित इंद्रजीत महिंद्रकरला मुंबई उपनगरच्या सागर शेणोय याने बरोबरीत रोखले. चौथ्या फेरीत नाशिकच्या गणेश ताजणे याने नागपूरच्या शुभम लाकुद्कारचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली.
२३ जिल्ह्यातील एकूण १४४ खेळाडू सहभागी झालेल्या ह्या रत्नागिरीतील पहिल्या वहिल्या फिडे मानांकन क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत रात्न्गीरीतील बुद्धिबळपटू देखील उत्तम कामगिरी बजावत असून सौरीश कशेळकर साडे तीन गुणांसह गुणतालिकेत रत्नागिरीतील अव्वल खेळाडू ठरला आहे. तसेच नवोदित बुद्धिबळपटू मानस सिधये, आयुष रायकर, अलिक गांगुली, आरव निमकर, आर्यन धुळप, कौस्तुभ हर्डीकर, सोहम कुरवार, हर्ष चव्हाण आणि लवेश पावसकर यांनी उत्तम कामगिरी करीत फिडे मानांकन मिळण्याच्या आशा प्रज्ज्वलित केल्या आहेत.
उद्या दि. १८ रोजी स्पर्धेची सांगता होणार असून अजून एकूण चर फेऱ्या शिल्लक आहेत. स्पर्धेत मुख्य पंच श्री. भरत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्राची मयेकर, पौर्णिमा उपळावीकर माने, मनीष मारूळकर व शशिकांत मक्तेदार काम पाहत असून सर्व तांत्रिक जबाबदारी विवेक सोहनी व चैतन्य भिडे पार पाडीत आहेत.
ही स्पर्धा मराठा भवन मंगल कार्यालय, माळ नाका, रत्नागिरी येथे आयोजित केली गेली असून सर्व बुद्धिबळप्रेमींनी १६-१८ जानेवारी दरम्यान स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

