(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठी देण्यात येणारा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेच्या सौ. उज्ज्वला प्रभाकर बापट यांना जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक पारितोषिक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा विशेष सन्मान होणार आहे.
सौ. उज्ज्वला प्रभाकर बापट ह्या मागील अनेक वर्ष सातत्याने साहित्य क्षेत्रामध्ये कवितेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करत असून, त्यासाठी विविध विषयावर त्यांनी आतापर्यंत कविता लेखन व सादरीकरण केले आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामधील प्रश्न आपल्या साहितत्याच्या माध्यमातून साहित्य जगण्याला दिशा देते, हे त्यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिले आहे. आपले कुटुंब, कुटुंबातील माणसे यांना जपतानच त्यांनी एलिया साहित्यातील रुची नियमीतपणे जपत लेखन केले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमात सहभागी होत त्यांनी अनेक वेळा त्यात सादरीकरण केले आहे. एक संवेदनशील आई, कर्तव्यदक्ष पत्नी आणि समाजभान जपणारी लेखिका अशा तिहेरी भूमिकेत त्यांनी काम करत लेखन सुरू ठेवले आहे. त्यांच्या याच लक्षवेधी कार्याची दखल घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, दीपा ठाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अगदी सहज आणि सोप्या शब्दात सामाजिक वेदना मांडत, कवितेच्या माध्यमातून साहित्यलेखन करणा-या सौ. उज्ज्वला प्रभाकर बापट यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

