(रत्नागिरी / प्रतिनिधी)
निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी जपलेला रत्नागिरीचा सुप्रसिद्ध हापूस अखेर बाजारपेठेत दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल एक महिना उशिराने हापूसचा पहिला माल शुक्रवारी (दि. ६ मार्च) रत्नागिरीच्या बाजारात आला असून, आवक अत्यंत मर्यादित असल्याने दरही तुलनेने जास्त असल्याचे चित्र आहे.
पावस (ता. रत्नागिरी) येथील बागायतदारांनी तोड केलेला हापूस स्थानिक विक्रेते सतीश पवार यांच्या स्टॉलवर विक्रीसाठी दाखल झाला. पहिल्या टप्प्यात अवघी अडीच डझन आंब्यांचीच आवक झाली असून सध्या दोन ते अडीच हजार रुपये डझन या दराने हापूसची विक्री सुरू आहे. गतवर्षी हंगामाच्या प्रारंभी हा दर तीन ते साडेतीन हजार रुपये डझनपर्यंत पोहोचला होता.
यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा पिकाला बसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिलेला पाऊस, ऑक्टोबर हीटचे अल्प प्रमाण आणि डिसेंबरपासून वाढलेली थंडी यामुळे आंब्याच्या फुलोऱ्यावर परिणाम झाला. थंडी आणि ओलाव्यामुळे मोहर मोठ्या प्रमाणावर आला असला तरी अति थंडीमुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. अनेक ठिकाणी मोहर काळवंडून गळून पडल्याने उत्पादन घटले. सद्यस्थितीत केवळ १० ते १५ टक्के इतकाच आंबा झाडांवर शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे आंबा भाजण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबाच आता बाजारात दाखल होऊ लागला आहे.
दरम्यान, रत्नागिरीतील पवार यांच्या स्टॉलवर हापूससोबत देवगड हापूस, पायरी आंबा तसेच रायवळ कैरीही विक्रीसाठी उपलब्ध आहे. पायरी आंबा १८०० ते दोन हजार रुपये डझन दराने, तर रायवळ कैरी १२० ते १५० रुपये किलो दराने विक्रीस ठेवण्यात आली आहे. मर्यादित आवक आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे यंदाचा हापूस हंगाम कसा राहणार, याकडे बागायतदारांसह ग्राहकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

