(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या झाडगाव झोपडपट्टी परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनिल चंद्रकांत माने (वय २६, रा. झाडगाव झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास त्याने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर ही बाब घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे झाडगाव परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण वयात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

