(पुणे)
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागल्याने न्यायव्यवस्थेच्या वेगवान कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
देशभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या नसरापूर बालिका बलात्कार आणि हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल देताना आरोपीचे कृत्य “दुर्मिळातील दुर्मिळ” स्वरूपाचे असल्याचे नमूद केले. अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागल्याने पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करत पुणे पोलिसांनी केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने सलग सुनावणी घेत अवघ्या दोन महिन्यांत निकाल दिला. या खटल्याचा १३७ पानांचा सविस्तर निकाल न्यायालयाने दिला आहे.
“या नराधमासाठी फाशीपेक्षाही कमी शिक्षा”
निकाल देताना न्यायालयाने आरोपीच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. न्यायाधीशांनी नमूद केले की, “या नराधमासाठी फाशीपेक्षाही कमी शिक्षा आहे.” आरोपीमध्ये कोणताही पश्चात्ताप नसल्याचे निरीक्षण नोंदवत तो सुधारणेच्या पलीकडे गेला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलिस, डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे न्यायालयाकडून कौतुक
या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या वेगवान आणि शास्त्रशुद्ध तपासाचे न्यायालयाने विशेष कौतुक केले. तसेच डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, सायबर एक्स्पर्ट आणि विशेष सरकारी वकिलांनी पुरावे भक्कमपणे मांडल्यामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होण्यास मोठी मदत झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. हा संपूर्ण तपास आणि खटला ‘टीमवर्क’चे उत्कृष्ट उदाहरण असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही ठरला महत्त्वाचा
शिक्षा सुनावताना न्यायालयाने आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही उल्लेख केला. यापूर्वीही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, एका वृद्ध महिलेवर हल्ला तसेच अन्य एका महिलेवर अत्याचार केल्याची प्रकरणे त्याच्याविरुद्ध असल्याचे न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आरोपी सुधारणेच्या पलीकडे गेला असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
५५ साक्षीदारांच्या साक्षी, सातही आरोप सिद्ध
या खटल्यात एकूण ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, वैज्ञानिक पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांचा आधार घेत न्यायालयाने आरोपीविरुद्धचे सर्व सात आरोप सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. बलात्कारानंतर अमानुष हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यासाठी मृत्युदंड हीच योग्य शिक्षा असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.

