( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राजापूर अर्बन बँकेच्या कर्ज व्यवहारातील गैरप्रकारांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक भूमिका घेणार आहे. या प्रकरणी पीडित ग्राहकांना आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गावर जाऊ न देता त्यांना दिलासा देण्यासाठी समिती कटिबद्ध असून, आवश्यकतेनुसार आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांनी दिला. ॲड करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष अनंत शिंदे उपस्थित होते.
काही कर्जदारांनी आपल्या नावावर बोगस कर्जप्रकरणे दाखल झाल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी मागणीप्रमाणे कर्जखात्याचे कागदपत्र न दिल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालकांनीही काही प्रकरणांत त्रुटी झाल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत होणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.
तसेच, कलम १०१ अंतर्गत वसुली दाखला दिल्यास कर्जदारांचे मोठे नुकसान होईल, याची शक्यता वर्तवत समितीने राजापूर अर्बन बँकेच्या सर्व कर्जप्रकरणांची चौकशी करून कर्जदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन सहाय्यक निबंधकांना देण्यात आल्याची माहितीही ॲड. करंदीकर यांनी दिली.

