(रत्नागिरी)
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे हे तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला सन्मान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास विविध शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून श्री. घाटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम केला.
समाज कल्याण विभागातील कार्यकाळात श्री. घाटे यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेच्या बळावर वंचित घटक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तसेच गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. तसेच विभागात सकारात्मक आणि लोकाभिमुख कार्यसंस्कृती निर्माण करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना होती. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री. घाटे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत आशिष कांबळे यांनी केले. प्रस्तावना समता दूत रूपाली बाईत यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन आशिष कांबळे यांनी केले.

