(नाणीज)
संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरु रामानंदचार्य यांची जयंती असा संयुक्त सोहळा रविवारी नाणीजक्षेत्री उत्साहात होत आहे. त्यानिमित्त याग, निमंत्रण मिरवणुका, शोभायात्रा, सामाजिक उपक्रम, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वारी उत्सव सोहळ्याची सुरुवात उद्या (शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी) होईल. सकाळी नऊपासून श्री महामृत्युंजय दक्षिणामूर्तीयाग सुरू होईल. त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकांनी देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत.
रविवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी नऊ पासून सर्वांचे आकर्षण असलेली शोभायात्रा सुरू होईल. त्यात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा, येथील लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ढोलताशे, लेझीम, हलगी अशी विविध वाद्ये, नृत्ये यांचे सादरीकरण करत भक्तांच्या अभूतपूर्व गर्दीत शोभा यात्रेला प्रारंभ होईल यामध्ये जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचा रथ असेल. देशाच्या विविध आखाड्यांतून आलेल्या साधुसंतांचाही रथ असेल. त्याशिवाय विविध सजीव देखाव्याचे रथही त्यात असतील.
रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सामाजिक उपक्रमांची देशभर चर्चा आहे. अपघातातील जखमींसाठी रुग्णवाहिकांचा उपक्रम, देहदान, अवयवदान, रक्तदान यामधील त्यांचे योगदान मोठे आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या रक्तदान शिबिरातून १,७१,१५० कुपिकांचे संकलन झाले, हा एक विक्रम आहे. त्यानिमित्त सोहळ्यात दुपारी रक्तदान संकल्पपूर्ती केलेल्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रात्री ७.३० ते ९ प.पू. कानिफनाथ महाराज यांचे हिंदीतून अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर रामानंदचार्य या नरेंद्राचार्यजी यांचे अमृतमय प्रवचन होईल. देवाला साकडे घातले जाईल व सोहळ्याची सांगता होईल.
दोन्ही दिवस मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसाद आहे. दरम्यान सुंदरगडावर भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी मोठ्या संख्येने भाविक येतील. सोहळ्यासाठी सुंदरगड सज्ज झाला आहे.

