(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या डॉ.नानासाहेब मयेकर चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धांमध्ये मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज ने सलग तिसऱ्यांदा दर्जेदार आणि उत्तम खेळाचे प्रदर्शन करून डॉ नानासाहेब मयेकर जनरल चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला आहे. सदर स्पर्धा या डॉ नानासाहेब मयेकर फाऊंडेशन व मोहिनी मुरारी शिक्षण संस्था आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत दरवर्षी डॉ नानासाहेब मयेकर यांच्या जन्मदिनी ३० नोहेंबर आणि २ ऑक्टोबर पुण्यतिथी निमित्त घेण्यात येतात यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. त्यानिमित्त दर्जेदार आणि उत्तम व्यवस्था निर्माण करून या स्पर्धा घेण्यात आल्या.
डॉ नानासाहेब मयेकर हे जिल्ह्यातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते, राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. या सर्वच क्षेत्रा मध्ये त्यांना प्रचंड आवड होती, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते चाफे या ठिकाणी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सिनिअर कॉलेज निर्माण करून त्यांची सोय केली. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेच्या तिन्ही शाळांचा दर्जा वाढवला व सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. डॉ नानासाहेब मयेकर यांचा हा वारसा पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र रोहीत मयेकर हे करताना दिसत आहेत त्यांच्या संकल्पनेतून डॉ नानासाहेब मयेकर फाऊंडेशन ही संस्था स्थापन झाली आणि या फाऊंडेशन मार्फत ही जनरल चॅम्पियनशिप देण्याची प्रथा गेली दोन वर्षे अतिशय छान प्रकारे नेटके नियोजन करून घेण्यात येते.
या चॅम्पियनशिप मध्ये मालगुंड एज्युकेशन सोसायटी च्या तीन शाळा बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड, तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय आणि बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी आणि डॉ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली तसेच मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड चे सुनिल मुरारी मयेकर ज्युनिअर कॉलेज चाफे आणि या वर्षी नव्याने या समूहात दाखल झालेली डी जे सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या सर्व शाळा या चॅम्पियनशिप साठी मैदानात उतरल्या होत्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खोखो ,रस्सीखेच ,धावणे ,बुद्धिबळ कॅरम ,समालोचन अशा स्वरूपाच्या स्पर्धांचा समावेश होता,आणि या सगळ्या मध्ये मालगुंड प्राशाला आणि ज्युनिअर कॉलेज च्या सर्व खेळाडूंनी दर्जेदार आणि उत्तम खेळाचे प्रदर्शन करून ही चॅम्पियनशिप सलग तिसऱ्यांदा पटकावून अजय राहण्याचा विक्रम केला आहे.
या क्रीडा स्पर्धांसाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे संचालक व मोहिनी मुरारी शिक्षण संस्था मालगुंड चे कार्याध्यक्ष व सचिव तसेच डॉ नानासाहेब मयेकर फाऊंडेशन चे संस्थापक रोहित मयेकर, नंदकुमार साळवी, किशोर पाटील, नानी मयेकर, मयेकर मॅडम,संकेत देसाई, सुरेंद्र माचिवले, चाफे कॉलेज च्या प्राचार्या स्नेहा पालये , मुख्याध्यापक नितीन मोरे, आशिष घाग, उमेश केळकर, हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चाफे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, तसेच सर्व विद्यार्थी तसेच एन सी सी, एन एस एस विभागातील चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रचंड मेहनत घेतली .