( ठाणे )
डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना कल्याण येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आरोपींच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावरील सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.
सुनावणीपूर्वी रमेश म्हात्रे यांच्या समर्थकांनी कल्याण न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. सुरक्षेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल करत आरोपींना प्रत्यक्ष उपस्थित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आणि चारही आरोपींची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने पार पडली.
सुनावणीनंतर न्यायालयाने चारही आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींचे वकील अॅड. ए. वाय. पत्की यांनी जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने सरकारी पक्षाला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून, जामीन अर्जावर पुढील काही दिवसांत सुनावणी होणार आहे.
गर्भवती महिलेच्या उपचारावरून वाद
शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचाराच्या कारणावरून झालेल्या वादानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध म्हणून केडीएमसीच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टरांनी नियमित ओपीडी सेवा बंद ठेवून केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या.
BNS आणि मेडिकेअर कायद्यांतर्गत गुन्हा
डॉ. वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र मेडिकेअर सेवा व्यक्ती व संस्था (हिंसाचार प्रतिबंधक) अधिनियम, 2010 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत चारही आरोपींना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले असून कारागृहाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘व्हीआयपी ट्रीटमेंट’वरून वाद
दरम्यान, यापूर्वी आरोपी रमेश म्हात्रे यांना न्यायालयात हजर करताना त्यांना कथित ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काही वकिलांना न्यायालयात प्रवेश नाकारल्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण बार असोसिएशनने पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद गरुड यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस विरुद्ध वकील असा संघर्षही समोर येताना दिसत आहे.

