( शिर्डी )
प्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी रविवारी सहकुटुंब शिर्डी साईबाबा मंदिर येथे भेट देत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून आपण नियमितपणे शिर्डीत साईदर्शनासाठी येत असल्याचे सांगताना, आज पुन्हा एकदा साईचरणी येण्याचा योग आल्याने मन भरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सचिन खेडेकर यांना साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या आध्यात्मिक वातावरणाने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. समाधी दर्शनानंतर खेडेकर कुटुंबीयांनी द्वारकामाई तसेच गुरुस्थान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले.
साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केला. यावेळी सचिन खेडेकर यांनी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. सामान्य भाविकांपासून व्हीआयपी भाविकांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिर्डीतील आध्यात्मिक वातावरण आणि संस्थानची कार्यपद्धती भाविकांना सकारात्मक अनुभव देणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

