(ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी–निजामपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीने चांगलंच राजकीय वादळ निर्माण केलं असून, कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख व माजी महापौर विलास पाटील यांनी थेट पोलीस कोठडीतून येत महापालिका सचिवांच्या दालनात महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे वेधलं गेलं आहे. विशेष म्हणजे विलास पाटील यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील यांनीही महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. केवळ पाच नगरसेवक असतानाही विलास पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षांचे राजकीय गणित बिघडवण्याची तयारी दर्शवली असल्याचं चित्र आहे.
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणात विलास पाटील यांना अटक केली असून, घरे देण्याच्या बहाण्याने अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण 2025 मध्ये दाखल झाले होते. विलास पाटील यांना एक कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक केल्यानंतर भिवंडीच्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. सुट्टीच्या न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या अटकेनंतर महापौर निवडणुकीचं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भिवंडी–निजामपूर महानगरपालिकेच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेले विलास पाटील यापूर्वीही विविध पक्षांच्या गणितात निर्णायक भूमिका बजावत आले आहेत. निवडणुकीनंतर 18 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या हाणामारी प्रकरणात ते फरार होते, तर 7 फेब्रुवारीला त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. सध्या त्यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवत सदस्यांची जमवाजमव सुरू केल्याचं बोललं जात आहे.
महापौर पदासाठी एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून भाजपकडून नारायण चौधरी यांनी दोन तर स्नेहा पाटील यांनी एक अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे, काँग्रेसकडून तारिक मोमीन, कोणार्क विकास आघाडीकडून विलास पाटील, प्रतिभा पाटील आणि मयुरेश पाटील, तर भिवंडी विकास आघाडीकडून जावेद दळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठीही सात उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शिवसेनेकडून अस्मिता नाईक, काँग्रेसकडून तारिक मोमीन, भाजपकडून सुहास नकाते, समाजवादीकडून अरीब शेख, कोणार्ककडून मयुरेश पाटील आणि भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना महापालिका आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच विविध पक्षांचे नेते, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
90 नगरसेवकांच्या पालिकेत सत्तेसाठी 47 नगरसेवकांची गरज असून काँग्रेसकडे 30, भाजपकडे 23, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 12, शिवसेनेकडे 12, समाजवादीकडे 6, कोणार्क विकास आघाडीकडे 5 आणि भिवंडी विकास आघाडीकडे 3 नगरसेवक आहेत. सेक्युलर फ्रंटमधून समाजवादी पक्ष बाहेर पडला असून युतीतही ताटातूट झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महापौर निवडणुकीतून माघार घेतल्याने 20 फेब्रुवारी रोजी होणारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

