(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरीच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या जिद्द, चिकाटी व कर्तृत्वाच्या बळावर सातासमुद्रापार नवे शिखर गाठणाऱ्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे. अमेरिकन लष्कराचे अत्यंत कठोर, शिस्तबद्ध आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत अमेरिकन सैन्यात दाखल होणाऱ्या पहिल्या मराठी महिला होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. कोकणच्या कन्येच्या या उल्लेखनीय यशाने रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
प्राजक्ता यांचे बालपण दापोलीत गेले. लहानपणापासूनच सैनिकी गणवेश परिधान करून देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. मात्र, एका दुर्दैवी अपघातामुळे भारतीय सैन्यात भरती होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिली. अनेकांसाठी हा प्रवास तेथेच थांबला असता; परंतु प्राजक्ता यांनी अपयशाला शरण न जाता त्यालाच नव्या यशाची दिशा बनवली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि ‘क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट’ म्हणून विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. याचबरोबर त्यांनी ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा मानाचा किताब पटकावत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलकही जगाला दाखवून दिली.
सैन्याविषयीची ओढ मात्र कधीच कमी झाली नाही. जीवनाच्या पुढील टप्प्यावर त्यांनी पुन्हा एकदा लष्करी सेवेकडे वाटचाल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कठोर शारीरिक कसोटी, मानसिक खंबीरता आणि अत्यंत शिस्तबद्ध प्रशिक्षणाचा यशस्वी सामना करत त्यांनी अमेरिकन लष्कराचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीबद्दल त्यांना ‘मार्क्समनशिप’ पदकाने गौरविण्यात आले. तसेच आपल्या बॅचमध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवत त्यांनी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
सध्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात कार्यरत असून, आरोग्य सेवेद्वारे सैनिकांची सेवा बजावत आहेत. या संपूर्ण प्रवासात पती समीर बोंगाळे आणि कुटुंबीयांनी दिलेला खंबीर पाठिंबा हीच आपल्या यशामागील सर्वात मोठी ताकद असल्याची भावना त्या व्यक्त करतात. विज्ञान क्षेत्रातील यश, आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेतील मानाचा किताब आणि आता जगातील बलाढ्य सैन्यदलांपैकी एका सैन्यात मानाचे स्थान मिळविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. रत्नागिरीच्या या लेकीने आपल्या कर्तृत्वाने केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.

