(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अलीकडच्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून काही प्रमुख नेत्यांची नावे गायब झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ या तीन महत्वाच्या नेत्यांची नावे नसल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले होते.
शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चांना आणखी वेग
दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला. मात्र, या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तटकरे म्हणाले, “शरद पवार यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. ते Breach Candy Hospital येथे उपचार घेत होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी काही दिवसांपूर्वीच वेळ मागितली होती.”
ते पुढे म्हणाले, “आज मी गुवाहाटी येथे एनडीएच्या मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमासाठी गेलो होतो. उद्या नितेश राणे यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे आणि पुढील काही दिवस माझेही दौरे आहेत. त्यामुळे आज वेळ मिळाल्याने शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा अन्य कोणत्याही राजकीय विषयाशी संबंध नाही.”
“सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली काम सुरूच राहणार”
राष्ट्रीय कार्यकारिणीतील नावांच्या गोंधळाबाबत विचारले असता तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “त्या विषयाशी या भेटीचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी आधीच सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली आहे. मला त्यावर अधिक काही बोलायचे नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले निर्णय आणि आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले काम आम्ही ठामपणे पुढे चालू ठेवणार आहोत,” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

