(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ फाटा येथे रस्त्याच्या मध्यभागी पडलेला भला मोठा आणि खोल खड्डा वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असतानाही संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तुरळ फाटा हा कडवईसह परिसरातील अनेक गावांचा प्रमुख संपर्कमार्ग आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या या खोल खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने त्याची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी वाहने थेट खड्ड्यात आदळून अपघात घडत आहेत. अवघ्या चार दिवसांपूर्वी कोळसा वाहून नेणारा कंटेनर याच ठिकाणी पलटी झाला होता. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आज पुन्हा दोन वाहने त्याच खड्ड्यात अडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी प्रशासन एखाद्या गंभीर दुर्घटनेचीच वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या ठिकाणाजवळ शाळा असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. दररोज शेकडो विद्यार्थी हा रस्ता ओलांडतात. भरधाव वाहतूक, पावसामुळे दृष्टीआड होणारा खड्डा आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी अनेकदा महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदाराकडे दुरुस्तीची मागणी केली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. केवळ कागदोपत्री हालचाली आणि पोकळ आश्वासनांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा बेफिकिरीचा खेळ आता असह्य झाला असून, तातडीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. वेळेत उपाययोजना करून आणखी एखादा निष्पाप जीव धोक्यात जाण्यापासून रोखणे, ही आता संबंधित यंत्रणांची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

