(संगमेश्वर)
कोंडगाव तिठ्यापासून सुमारे 30 मीटर अंतरावर देवरूख रोडवर 26 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि एसटी बसमध्ये अपघात झाला. या प्रकरणी कंटेनर चालक तानाजी ज्ञानेश्वर बागल (रा. गादेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध 26 जून रोजी दुपारी 2.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल दिनकर दळवी (वय 34), व्यवसायाने चालक, सध्या खेड एसटी आगार कॉलनी येथे वास्तव्यास असून, मूळ रहिवासी पिंपळगाव खवडा, ता. नगर, जि. अहमदनगर, यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तानाजी बागल हा आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक डीडी-03-पी-9420) लोटे–खेड येथून देवरूखमार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता.
दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच-20-बीएल-1960) ला जोरात धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या निष्काळजी व बेदरकार वाहन चालवण्याच्या प्रकारामुळे तानाजी बागल याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.