(संगमेश्वर / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सप्तलिंगी येथील जुन्या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटले असून पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूंना रस्ता समपातळीत नसल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ २०१४ मध्ये सप्तलिंगी येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाच्या पायाभरणीने झाला होता. वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या पुलाचे काम प्रत्यक्षात तब्बल आठ वर्षांनी पूर्ण झाले. या विलंबामुळे महामार्गाच्या कामाची गती किती संथ होती, याची प्रचिती आली. मात्र नवीन पुलाच्या कामाबरोबरच याच ठिकाणी असलेल्या जुन्या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आता हा पूल धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.
सप्तलिंगी येथील जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे पूर्णपणे तुटले आहेत. जुन्या पिलर्सवर झुडपे वाढली असून पुलाच्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डे चुकविताना एखादे वाहन बाजूला गेल्यास कठडे नसल्यामुळे वाहन थेट पुलाखाली कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता समपातळीत नसल्याने वेगाने येणारी वाहने जोरदारपणे आदळतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याच्या घटनाही घडत आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी अनेक ठिकाणी रस्त्याला तडे, असमतोल पृष्ठभाग, अल्पावधीत पडलेले खड्डे, दरडी कोसळण्याच्या घटना, अपूर्ण गटारांची कामे आणि अर्धवट सेवा रस्ते यामुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त आहेत. आरवली ते बावनदी या पट्ट्यात कामाच्या दर्जाबाबतही स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ठेकेदाराकडून सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. असे असतानाही कामाच्या दर्जात त्रुटी का राहिल्या, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिकांच्या रोषाचा उद्रेक होण्यापूर्वी महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. विशेषतः सप्तलिंगी येथील जुन्या पुलाचे तुटलेले कठडे, खड्डे आणि असमतोल रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

