(साखरपा / वार्ताहर)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील नागमोडी वळणावर शुक्रवारी रात्री डंपरचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. हा डंपर रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट कंपनीचा असल्याचे समजते.
अपघातात डंपर चालक देवीलाल याला किरकोळ दुखापत झाली असून तो सुखरूप आहे. मात्र अपघातानंतर महामार्गावर शनिवारी सकाळपासून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. क्रेनच्या मदतीने पलटी झालेला डंपर रस्त्याच्या कडेला हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.

